जि.प. प्राथमिक शाळा पठारवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

(फोटो – पठारवाडी (ता. पुरंदर) येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना अर्चनाताई कटके समवेत दीपश्री वाणी, विठ्ठलशेठ चौधरी व इतर मान्यवर)
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२९ ऑगस्ट , २०२६:
“प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण अध्यापन करावे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार”, असे प्रतिपादन पुरंदर पंचायत समितीच्या सदस्या सौ.अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके यांनी केले.
जि.प. प्राथमिक शाळा पठारवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न पार पडली. उद्घाटन प्रसंगी सौ. अर्चनाताई कटके बोलत होत्या.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला चांबळी केंद्राच्या केंद्रप्रमुख दीपश्री वाणी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री चौधरी, उद्योजक शेखर पिसे, मोहन चौधरी, उमेश मांढरे, प्रसाद घाटे, विजय घाटे, विठ्ठलशेठ चौधरी, सुरज घाटे, विशेष शिक्षक दीपक पाटील आदींसह चांबळी केंद्रातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चनाताई कटके यांच्याकडून शाळेला वॉटर फिल्टर, उद्योजक शेखर पिसे व मोहन चौधरी यांच्या कडून पाण्याची टाकी, शैक्षणिक साहित्य, सुरज घाटे यांच्याकडून संगणक व उमेश मांढरे यांच्याकडून फळझाडे भेट देण्यात आली, अशी माहिती उद्योजक विठ्ठलशेठ चौधरी यांनी दिली.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये जयश्री गजधने व सुवासिनी चव्हाण यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील गाडे यांनी केले. आभार सहशिक्षक रोहिदास तांदळे यांनी मानले.
