
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१० सप्टेंबर, २०२६:
सानिध्य फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा सौ. प्रतिमा प्रकाश जगताप यांच्या गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी, “महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवा विकास, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू व वंचित घटकांसाठी प्रतिमा जगताप यांनी सातत्याने केलेले कार्य समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला सानिध्य फाउंडेशनच्या माध्यमातून आता अधिक व्यापक स्वरूप मिळत असून, आगामी काळात या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मदत केली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
बेलसर (ता.पुरंदर) येथील बेलसर निळुंज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीत सानिध्य फाउंडेशनचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सौ. प्रतिमा प्रकाश जगताप यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करून फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी, “प्रतिमा जगताप यांचा दोन दशकांचा सामाजिक कार्याचा अनुभव आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ कौतुकास्पद आहे. सानिध्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला संस्थात्मक बळ मिळाले असून, हे फाउंडेशन समाजातील गरजू घटकांसाठी निश्चितच दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल,” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजिका तथा सानिध्य फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा सौ. प्रतिमा प्रकाश जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात कॉलेज जीवनापासून सुरू झालेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात, विधवांसाठी हळदी-कुंकूचा अनोखा उपक्रम, आय.टी क्षेत्रात १८ वर्षे काम करताना, सी.एस.आर च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, इन्फोसिस फाउंडेशन नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशन यांच्या विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिरांचे आयोजन, कोरोना काळात बेड, ऑक्सिजन, प्लाझ्मा व समुपदेशनासाठी केलेले कार्य, बांधकाम साइटवरील मुलांचे शिक्षण, डोंगर-पाड्यातील मुलांना सुविधा, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, युवकांना करिअर मार्गदर्शन, वृद्धाश्रमांना मदत तसेच सी.एस.आर च्या माध्यमातून शाळांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, अशा विविध कार्यांची माहिती त्यांनी दिली.
“सानिध्य फाउंडेशनची आज स्थापना होत असली, तरी सामाजिक कार्याची सुरुवात दोन दशकांपूर्वी झाली आहे. समाजातील गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यापुढेही राहील. या कार्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा, सहकार्य आणि आशीर्वादांचे बळ हवे,” असे प्रतिमा प्रकाश जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमात बेलसर गावातील ज्येष्ठ महिला, युवा उद्योजक, माजी सैनिक तसेच शिष्यवृत्ती, मंथन स्कॉलरशिप आणि वेशभूषा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पुरंदर -हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हरिभाऊ लोळे, अजय इंगळे, भाजप युवा मोर्चाचे सचिव श्रीकांत ताम्हाणे, नगरसेवक गणेश जगताप, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, ॲड. रोहित सावंत, बेलसरचे सरपंच अर्जुन झेंडे, माजी सरपंच विलास जगताप, माजी चेअरमन मामासाहेब गरुड, माजी सरपंच निलेश जगताप, उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप, बेलसरचे मा. उपसरपंच धीरज जगताप, चंद्रकांत हिंगणे, हनुमंत जगताप, चेअरमन कैलास जगताप, मा. सरपंच वनिता जगताप, सुजाता हिंगणे, पोलीस पाटील पायल राऊत, संचालिका सुरेखा जगताप, निवृत्त कृषी अधिकारी संभाजी गरुड, आदर्श शिक्षक भीमराव कदम यांच्यासह बेलसर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. तर आभार पुणे जिल्हा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी मानले.
