
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१ सप्टेंबर,२०२६:
सृष्टीतील चराचराला बहर येतो, तो श्रावण महिन्यात आणि या बहारामुळेच कवी साहित्यिकांच्या लेखणीतून शब्दांच्या भावनांना नवचैतन्य मिळते. म्हणून साहित्य सम्राट पुणे हि संस्था अनेक वर्षापासून श्रावण महिन्यात निसर्ग सानिध्यात साहित्यिकांच्या गावाला भेट देत असते. श्रावण सहल उपक्रमाद्वारे निसर्ग आणि मराठी भाषेचे सौंदर्य शब्दातून फुलवण्याचे कार्य संस्था करत आहे. आज आपल्या मातृभाषेचे महत्व आपणच घरापासून टिकवण्याची गरज आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा अजिंक्यतारा किल्ला तसेच श्री समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड अशा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रेरणादायी स्थळी सहल आयोजित केली आहे. जकातवाडी हे गाव आता कवितांचा गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. हे खूप महान आणि महत्त्वाचे कार्य येथील भाषाप्रेमी विचारवंतांनी हाती घेतले आहे. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
जगातील पहिले कवितांचे गाव येथे माझं कवितांचं गाव आणि साहित्य सम्राट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जकातवाडी राजधानी सातारा येथे २२९ वे कवी संमेलन आयोजित केले होते. मंचावर माझं कवितांचं गाव अध्यक्ष प्रल्हाद पारटे, उपाध्यक्ष विश्वास नेरकर, कार्याध्यक्षा सुषमा अलेकरी, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव प्रज्ञा रोकडे, प्र.पाहुणे शरदचंद्र काकडे, संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ आणि निवेदक जगदीप वनशिव उपस्थित होते.

ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचा भक्कमपणा, सौंदर्य आणि शौर्य मनामध्ये साठवून कवीमनाचे साहित्यप्रेमी अध्यात्मिक विचारांच्या आणि थोरसंत समर्थ रामदास स्वामींच्या कर्तृत्वाने पावन झालेले सज्जनगडावर पोहोचले. त्यानंतर तनामनाने फुलून आलेली कवीमने जगातील पहिले कवितांचे गाव, माझं कवितांचं गाव या ठिकाणी मनातील कविता सादर करण्यासाठी प्रचंड उत्साहीत झाले. सुरुवातीला साहित्य सम्राटच्या पुण्याहून आलेल्या सर्व कवी कवयित्री या पाहुण्यांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. कवितांच्या गावात कवितांचे गाव होण्यासाठी कोणकोणते उपक्रम हाती घेऊन हे कवितांचे गाव साकार झालं याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास नेरकर यांनी प्रस्तावनेत दिली.

या कवी संमेलनामध्ये सुप्रसिद्ध कवी कवयित्री आदरणीय प्रल्हाद शिंदे, बाबासाहेब केमकर, वैभव होले, अलका जोशी, सुरेश वाळेकर, भरत माने, विलास बाबर, किशोर कसबे, दत्तात्रय कुलकर्णी, दत्तू ठोकळे, आनंद गायकवाड, जगदीप वनशिव, विनोद अष्टुळ, संजीवनी जगताप, बाळकृष्ण अमृतकर, शरदचंद्र काकडे, अरुणा यादव, गोरक्षनाथ मोरे, सुनंदा अमृतकर, रेखा जगताप, सुरेखा भोसले, उज्वला कुलकर्णी, अशोक जाधव, वंदना ढोले, अनिता क्षीरसागर, जुई भोसले, शशिकला भोसले, सारंग जगताप, चित्रा सोनोने, लक्ष्मण शिंदे, राजेंद्र पाटील, प्रज्ञा रोकडे अशा अनेकांनी आपल्या बहारदार काव्यरचना सादर करून कवितांच्या गावात काव्य रसिकांची मने जिंकली.
जकातवाडी हे गाव कवितांचं गाव होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. असे प्रतिज्ञा घेऊन कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी आपले मराठी काव्य संवर्धन कसे करावे याचे मार्गदर्शन आपल्या अभ्यासपूर्ण आभाराच्या भाषणातून उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा रोकडे आणि जगदीप वनशिव यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले.
