हाजी अरफात शेख यांची मंत्री पंकजा मुंडे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 ०७ ऑक्टोबर,२०२६:
महाराष्ट्रातील शेतकरी, पशुपालक, व्यापारी तसेच खाटीक समाजातील नागरिकांना शेळी-मेंढी व बकऱ्यांची कायदेशीर वाहतूक करताना वारंवार होणारा नाहक त्रास, आर्थिक शोषण आणि अनावश्यक अडथळे रोखण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र व वैज्ञानिक कार्यप्रणाली (एस.ओ.पी.) लागू करावी, अशी मागणी ‘राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थे’चे अध्यक्ष तथा भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

राज्यातील देवनार पशुवधगृहासह विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी तसेच पशुपालनासाठी शेळी-मेंढ्यांची कायदेशीर वाहतूक केली जाते आणि या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, वाहतुकीदरम्यान वाहनांना विनाकारण अडवून शेतकरी व व्यापाऱ्यांचे मानसिक आणि आर्थिक शोषण केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्रमुख महामार्गांवर जनावरांसाठी चारा, पाणी, सावली आणि प्राथमिक वैद्यकीय सोयींनी युक्त अशी अधिकृत विश्रांती केंद्रे (ॲनिमल ट्रान्झिट रेस्ट पॉईंट्स) उभारण्यात यावीत. तसेच शेळी-मेंढ्यांच्या वाहतुकीसाठी राज्यस्तरीय एकसमान वैज्ञानिक नियमावली तयार करून परिवहन, पशुसंवर्धन, पोलीस व आरटीओ विभागांना तिचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले जावेत. कायदेशीर कागदपत्रे बाळगणाऱ्या वाहतूकदारांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच पशुकल्याण व व्यापाऱ्यांचे हक्क यांचा समतोल राखणारी पारदर्शक यंत्रणा उभी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय, या विषयावर दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि व्यापारी प्रतिनिधींची एक संयुक्त समिती गठीत करावी, अशी विनंतीही हाजी अरफात शेख यांनी केली आहे.
