
🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.०१ ऑक्टोबर, २०२६:
डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसने आई-मुलीच्या नात्यातील परस्पर आधार अधोरेखित करणारी नवी चित्रफीत सादर केली आहे. ‘मेरी बेटी स्ट्राँग’ या मोहिमेचा वारसा पुढे नेत तयार करण्यात आलेल्या या चित्रफितीत मुलगी आईची ताकद बनते आणि तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला आधार देते, अशी मांडणी करण्यात आली आहे.
‘आईची मजबुरी नाही, मुलगी असते आईची मजबुती’ हा विचार चित्रफितीच्या केंद्रस्थानी आहे. डॉटर्स डेच्या निमित्ताने क्लिनिक प्लसने आई आणि मुलीच्या त्या नात्याकडे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये दोघीही नकळत एकमेकींचे बळ बनतात. भारतीय घरांमध्ये आई आपल्या मुलीला स्वतःसाठी उभे राहण्यास आणि स्वतःचा आवाज शोधण्यास शिकवते. मात्र, तिच्याकडून गप्प राहण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि स्वतःच्या वाट्याच्या तडजोडी सहन करण्याची अपेक्षा केली जाते.
आईचे न बोललेले त्याग आणि कठीण प्रसंगांमधील तिचा संयम मुलगी ओळखते. चित्रफितीत मुलीला केवळ वाढवायची लेक म्हणून नव्हे, तर आईचा आधार आणि विश्वासाची सोबतीण म्हणून दाखवण्यात आले आहे. तिची संवेदनशीलता, शांत उपस्थिती आणि विश्वास आईला पुढे पाऊल टाकण्याचे आणि स्वतःची निवड करण्याचे धैर्य देतात.
चित्रफितीची कथा एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याभोवती आहे. एक लेखिका स्वतःच्या आयुष्यातून उतरलेल्या कवितांचा संग्रह सादर करते. तिच्या लेखनामागील प्रेरणा कोण, असे विचारले असता ती आपल्या मुलीकडे बोट दाखवते. कथा त्यानंतर तिच्या बालपणातील एका प्रसंगाकडे वळते. दोन वेण्यांऐवजी एकच वेणी घालण्याचा तिचा हट्ट आणि त्यातून व्यक्त होणारी आतली ताकद या कथेतील महत्त्वाचा भाग आहे.
