
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१० सप्टेंबर,२०२६:
नेवसेवस्ती (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वीर (ता. पुरंदर) येथे क्षेत्रभेट दिली. यावेळी त्यांनी जलविद्युत निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली. मोठी यंत्र आणि तंत्रज्ञान पाहून विद्यार्थी हरखून गेले.
यावेळी फलटण विभागाचे नीरेच्या उजव्या कालव्याचे अभियंता रावसाहेब मोरे, उपविभागीय अधिकारी राहुल मिसाळ, शाखाधिकारी अथर्व चक्के यांनी पाण्यापासून वीज निर्मितीची प्रक्रिया, यांत्रिक कार्य तसेच येथे तयार होणाऱ्या ९ मेगावॅट विजेच्या प्रसारणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. येथील श्रीम्हस्कोबा मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट दिली. शाळेमार्फत वनभोजन घेण्यात आले.
अभियंता अथर्व चक्के अभियंता तसेच रावसाहेब लक्षमण सुद्रिक यांनी विद्यार्थी व पालकांना धरणाची तांत्रिक व भौगोलिक माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव दडस, नूतन अध्यक्ष पूनम रासकर, उपाध्यक्ष गौरी दडस ,शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंता रिटे यांनी क्षेत्रभेट नियोजन केले.
🔳 वैजयंता रिटे, मुख्याध्यापिका व आदर्श शिक्षिका, नेवसेवस्ती (पाडेगाव)🔳
“क्षेत्रभेट हि अनुभवाधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिल्याने संबोध स्पष्ट होतात तसेच अमूर्त कल्पना मूर्त होतात. वीर धरणभेट हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण ठरला त्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात धमाल करायची संधीदेखील मिळाली.”
