मुंबई विशेष प्रतिनिधी दि.05 ऑगस्ट, 2026:
भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत भायखळा विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई महानगर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या शहरी परिस्थितीत नियोजनबद्ध अंमलबजावणी करून मतदार पडताळणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याने निवडणूक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण झाला आहे.
मुंबईतील झोपडपट्ट्या, उंच निवासी इमारती, पुनर्विकास प्रकल्प, सततचे स्थलांतर, भाडेकरूंची बदलती संख्या, नागरिकांची अनुपस्थिती तसेच दुबार आणि मृत मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी अशा अनेक आव्हानांवर मात करत ही मोहीम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आली.
मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन, प्रभावी समन्वय, नियमित आढावा आणि तंत्रज्ञानाधारित अंमलबजावणी यांची प्रभावी सांगड घालण्यात आली. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना क्षेत्रनिहाय उद्दिष्टे देण्यात आली. दैनंदिन प्रगतीचा आढावा, प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय आणि सातत्यपूर्ण क्षेत्रभेटींमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहिली.
मुख्य ठळक मुद्दे :
✅ मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक
✅ एकूण मतदार : २,५८,५६६
✅ पडताळणी पूर्ण : १,९६,२४८ (७५.९० टक्के)
✅ पडताळणी प्रलंबित : ६२,३१८ (२४.१० टक्के)
✅ प्रगणन नमुने संकलित : २,५८,५६६
✅ २६५ मतदारस्तरीय अधिकारी, ५२ पर्यवेक्षक आणि २६ सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचा सहभाग
✅ राजकीय पक्षांच्या ५ समन्वय बैठका
✅ पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर
“ही कामगिरी संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सामूहिक समर्पणाचे फलित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, बीएलओ , सुपरवायझर्स, एईआरओ , अधिकारी-कर्मचारी, नागरिक, गृहनिर्माण संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आमचे ध्येय केवळ उद्दिष्ट पूर्ण करणे नव्हते, तर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनविणे हे होते.”
