
🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳(सुरेश गायकवाड):
गेली २० वर्षेाहून अधिक सरकारला शेकडो निवेदने, आंदोलन करून ही सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता सरकारने ३० जून पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मंत्रालयासमोर मांग-गारुडी समाज १ जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मांग-गारुडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मांग-गारुडी समाजाच्या विकासासाठी ५०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा, मांग-गारुडी समाजाचे स्वतंत्र समाज भवन मुंबई येथे उभारण्यात यावे, मांग-गारुडी समाजाच्या विकासासाठी अभ्यास आयोग नेमण्यात यावा, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडणारा विधान परिषद सदस्य नेमण्यात यावा, मांग-गारुडी समाजातील बेघर कुटूंबाला संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार घरकुल मंजूर करण्यात यावेत.
तसेच मागासवर्गीय शासकीय कार्यालयात मांग-गारुडी समाजातील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्यांमध्ये विशेष प्राधान्य देण्यात यावे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत पाच एकर जमीन मांग-गारुडी समाजातील भूमीहीनांना देण्यात यावी.
मांग-गारुडी समाजाचे जात दाखल्यांमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात तसेच मांग-गारुडी संघटनांच्या शिफारसीवर जातीचे दाखले देण्यात यावेत. समाज कल्याण योजने अंतर्गत मांग-गारुडी समाजातील उद्योजक घडवण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावा. मातंग समाजाची पोट जातीमधून वगळून आम्हाला आमची स्वतंत्र जातीचा दर्जा मिळावा, कारण आम्ही मातंग समाजाची पोट जात नाही.
