
🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.24:
आषाढी एकादशीचे औचित्य साधून मानसी सामाजिक संस्था व एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. या अभिनव उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पांडुरंगावरील अभंग सादर करून भक्ती, संस्कार आणि मराठी सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडविले.

या स्पर्धेत मोरू नारायण म्हात्रे विद्यालय उलवे, महात्मा स्कूल खांदा कॉलनी, श्री सुविद्या विद्यालय कामोठे, महात्मा स्कूल ऑफ अकॅडमी पनवेल, सौ. भागुबाई ठाकूर स्कूल उरण, वेस्टर्न हिल्स हायस्कूल कामोठे, ज्ञानवर्धिनी स्कुल शिरवळ, तसेच इतर अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या अथर्व जीवबा पोवार, याद्नी अनिल महाडिक, वैष्णवी नानासाहेब दुधाळ, उत्कर्षा तळेकर, चंदन भगत, ओंकार मंगेश महाडिक यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल अभंग गायनातून भक्तीभाव व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांना भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची आकर्षक मूर्ती भेटस्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, संस्कार, मराठी अभंग परंपरेची आवड आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची भावना विकसित करणे, हा असल्याचे मानसी सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ. गोरखनाथ पोळ यांनी सांगितले. एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊसच्या प्रोप्रायटर सौ. सविता गोरखनाथ पोळ यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळांचे आभार मानत भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
“सखा पांडुरंग” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला असून समाजातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
