
🔳 जेजुरी प्रतिनिधी 🔳 दि.१३जुलै,२०२६:
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे म्हटले आहे. अपघातातील मृत ३ वारकरी भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी अपघातग्रस्त वारकऱ्यांची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी जेजुरी-बेलसर परिसरात अपघात होऊन तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली, तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील, तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहने चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
🔳 अपघातातील तीन महिला मयत वारकऱ्यांची नावे 🔳
राजश्री शंकर भोसले वय ६२ (जि-सांगली), माधवी राजाराम सरवडे वय -५५ (जि-सांगली), नंदा बाबुराव पवार
वय -५२ (जि-सांगली).
